एका गावात वडाचं एक मोठ्ठं झाड होतं. तिथे एक कावळा आणि कावळी रहात होते. कावळी जेव्हा जेव्हा अंडी द्यायची तेव्हा दर वेळी त्या वडाच्या झाडाखाली राहणारा काळा साप ती अंडी खाऊन टाकायचा. त्यामुळे दुःखी झालेले कावळा आणि कावळी त्यांच्या मित्राकडे कोल्हयाकडे गेले आणि त्याला म्हणाले, "मित्रा, अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं रे! आम्ही त्या भयंकर सापापासून आमच्या बाळांचं रक्षण कसं करू? यासाठी काहीतरी उपाय सांग.
कावळ्याचं बोलणं ऐकून कोल्हा म्हणाला, "ज्या शत्रूशी लढाई करून जिंकता येत नसेल त्याला चतुराईने जिंकायला हवं. आपल्याला या सापापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय शोधावा लागणार." मग त्या कोल्हयाने कावळा आणि कावळीला सापाला मारण्याचा एक उपाय सुचवला.
कोल्हयाचं म्हणणं मान्य करून कावळा आणि कावळी एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या शोधात फिरू लागले. त्यांची दृष्टी जवळच्या एका तळ्यावर आंघोळ करण्यार्या राजावर पडली. राजाची वस्त्र आणि अलंकार तलावाच्या किनार्यावर ठेवले होते. कावळीने एक सोन्याचा हार आपल्या चोचीत पकडला आणि तिने आकाशात भरारी मारली. राजाचे रक्षक त्यांच्या मागे धावले. कावळीने तो हार वडाच्या झाडाच्या खाली असलेल्या सापाच्या बिळात टाकून दिला.
जेव्हा सैनिक तो हार घेण्यासाठी बिळापाशी आले तेव्हा त्यांना तो भयानक काळा साप दिसला. सैनिकांनी त्या सापाला मारलं आणि ते तो हार घेऊन निघून गेले.
आशा प्रकारे साप मेल्यामुळे कावळा आणि कावळी आपल्या घरट्यात सुखात राहू लागले.
म्हणूनच म्हणतात, 'जे काम चतुराईने होऊ शकतं तिथे बळाचा वापर करू नये.