पहिला भाग : श्रीकृष्णाचे वैकुंठ गमन
द्वापार युगाचा अंत जवळ येऊन ठेपला होता. ‘महाभारत’ युद्ध होऊन छत्तीस वर्ष झाली होती. गांधारीच्या शापानुसार, सात्यकी आणि कृतवर्मांच्या युद्धाने सुरू झालेल्या मतभेदाने आता संपूर्ण यादव वंश संपवला होता. बलराम स्वगृही परतल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आता पूर्णपणे एकटे पडले होते. आता त्यांनी उर्वरित आयुष्य जंगलात घालवण्यास सुरवात केली. एके दिवशी वनवासी जारा शिकारीच्या शोधात जंगलात फिरत होता. जाराला झुडूपांमध्ये एक हरिण असल्याचं लक्षात आलं, त्याने धनुष्य व्यवस्थित तयार ठेवलं आणि हरणावर बाण सोडला. जाराचं लक्ष्य अभेद्य होतं. गडद लाल रक्ताचा प्रवाह पाहताच जाराला तो विजयी झाल्याचं समजलं. मग त्याला हृदय पिळवटून टाकणाऱ्या आर्त आक्रोशाने काही काळ हादरवून टाकलं, त्याचा बाण हरिणाला न लागता चुकून माणसाला लागला होता.
जारा समोरचं दृश्य पाहून स्वत:वरच खूप रागावला आणि पश्चात्तापदग्ध झाला; कारण हरीण आहे असं समजून त्याने मारलेला बाण झुडुपामध्ये विश्रांती घेणाऱ्या एका माणसाच्या पायामध्ये घुसला होता. तो मनुष्य म्हणजे दुसरातिसरा कोणी नसून साक्षात द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण होते. त्या परिस्थितीत भेदरलेल्या जारानं आपल्या पापाची शिक्षा म्हणून स्वत:च्याही मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना केली.
स्वतःच्या नशिबाला दोष देत रडणाऱ्या जाराला पाहून भगवान श्रीकृष्ण जरासे हसले. ज्यांनी अधर्माचा अंत करण्यासाठी महाभारताची रचना केली, त्यांना स्वतःच्या पूर्वनिर्धारित मृत्यूची पद्धत कशी माहित नसेल? द्वापार युगात जारा हा भगवान श्रीकृष्णांच्या हत्येचं कारण ठरणार नाही तर त्यांच्या पार्थिव शरीराचा मुक्तीदाताच ठरणार आहे. हे सर्व पूर्वनिर्धारित होतं, असं सांगून शोकाकूल जाराचं भगवान श्रीकृष्णांनी सांत्वन केलं.
श्रीकृष्णांनी जाराची उत्सुकता पाहून त्याला त्याच्या आणि स्वतःच्या पूर्व जन्माची कथा सांगितली की ज्यामध्ये जाराच्याच हातून त्यांचा मृत्यू होणार हे विधिलिखित होतं. त्यांच्या पूर्वजन्मी म्हणजेच त्रेता युगात, भगवान श्रीरामांच्या अवताराने शक्तिशाली वानरराजा वालीचा वध केला होता. जरी हे कृत्य धर्म स्थापनेसाठी आवश्यक होतं, तरी ते युद्धाच्या नियमांच्या विरुद्ध होतं. भगवान श्रीरामांनी वालीचा वध करण्यासाठी कपटाचा आश्रय घेतला आणि झुडपांमध्ये लपून वालीवर बाण चालवला.
भगवान श्रीकृष्णांकडून ही कथा ऐकताना जाराला हे समजत नव्हतं की त्याच्याशी या कथेचा काय सबंध असेल. मात्र जेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं की त्रेता युगात तोच वानर राजा वाली होते, तेव्हा त्याची शंका दूर झाली. तोच वाली हा देवराज इंद्राचा पुत्र होता ज्याच्या पराक्रमामुळे राक्षसच नाही तर देवताही भीतीने थरथर कापत असत.
जाराला हे सगळं एक अविश्वसनीय स्वप्नच वाटत होतं. परंतु त्यालाही त्यावर विश्वास ठेवणं भाग होतं. भगवान श्रीकृष्णावर बाण मारून त्याने त्याचा प्रतिशोध घेतला होता. रामाप्रती खरी भक्ती, प्रेम आणि समर्पण यांमुळे स्वत: भगवंतांनी त्याला ही संधी दिली. जारारूपातल्या वालीनं स्वतःच्याही नकळत, अशा रितीनं स्वतःच्या हत्येचा प्रतिशोध घेतला होता.
त्या मनस्थितीत जारानं अर्जुनासमवेत भगवान श्रीकृष्णाचे अंत्तीम संस्कार केले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार, द्वारका शहराचा विनाश स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला. श्रीकृष्णांच्या शरीरावर अग्नीसंस्कार झाल्यावरही त्यांचं हृदय जसंच्या तसं राहिलं. अग्नी त्याला जाळू शकला नाही आणि ते अजूनही धडधडत होतं. श्रीकृष्णाच्या या उर्वरित अंशाचं अर्जुन आणि जारानं समुद्रात विसर्जन केलं. त्याच क्षणी द्वापार युग संपलं आणि कलियुग सुरू झालं.
आणखी एका समजुतीनुसार जारा हा वानर राजा वाली नव्हता तर त्याचा पुत्र अंगदाचा पुनर्जन्म होता.